गडचिरोली–सावली मार्गावर एसटी बस पलटी! किसाननगरजवळ भीषण अपघात; ८ प्रवासी जखमी, सुदैवाने जीवितहानी टळली

गडचिरोली–सावली मार्गावर एसटी बस पलटी!

किसाननगरजवळ भीषण अपघात; ८ प्रवासी जखमी, सुदैवाने जीवितहानी टळली

रस्त्याच्या कडेला उलटली बस; प्रवाशांमध्ये एकच आरडाओरडा — स्थानिक नागरिकांनी धाव घेत जखमींना बाहेर काढले

आनंद दहागावकर/गडचिरोली

गडचिरोली | दि. २८ नोव्हेंबर २०२६

गडचिरोलीहून सावलीकडे जाणाऱ्या एसटी बसला किसाननगर गावाजवळ भीषण अपघात झाला. चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला पलटी होऊन आठ प्रवासी जखमी झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. अपघातामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

गडचिरोली–सावली मार्गावर धावणारी एसटी बस क्र. एम.एच. १४ बीटी ५००९ ही बस किसाननगर गावाजवळ आली असता अचानक रस्त्याच्या कडेला पलटी झाली. बस उलटताच प्रवाशांमध्ये एकच आरडाओरडा सुरू झाला. अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

नागरिकांची तत्परता; प्रवाशांना तातडीने बाहेर काढले

बस पलटी झाल्यानंतर काही प्रवासी बसमध्ये अडकले होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. नागरिकांनी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून त्यांना प्राथमिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.

घटनेची माहिती मिळताच टोल नाक्याची अॅम्बुलन्स घटनास्थळी दाखल झाली. नागरिकांच्या मदतीने सर्व जखमी प्रवाशांना अॅम्बुलन्समधून गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असून, मिळालेल्या माहितीनुसार सर्व जखमींची प्रकृती स्थिर आहे.

आठ प्रवासी जखमी

या अपघातात पल्लवी आस्तिक दुधे, अयान आस्तिक दुधे व प्रियाश आस्तिक दुधे (सर्व रा. सावली), ज्योती चरणदास मडावी व आशिष चरणदास मडावी (रा. पावी मुरांडा), रघुराज बाजीराव शेडमाके व नथूजी नारायण शेडमाके (रा. हिरापूर) तसेच इंदुबाई गौतम बांबोडे (रा. घोडेवाही) हे आठ प्रवासी जखमी झाले आहेत.

सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला.

‘जुन्या बसेस’चा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

दरम्यान, या अपघातानंतर गडचिरोली–सावली मार्गावरील एसटी बससेवेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. या मार्गावर जुन्या व मोडकळीस आलेल्या बसेस धावत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे.

वारंवार जुन्या बसेस वापरल्या जात असल्याचा आरोप करत प्रवाशांनी या मार्गावर नवीन, सुरक्षित व सुस्थितीतील बसेस उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

मात्र, सदर अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याबाबत अधिकृत चौकशीतून वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. त्यामुळे बसच्या तांत्रिक स्थितीसह चालकाचा ताबा सुटण्यामागील नेमके कारण काय होते, याकडे आता लक्ष लागले आहे.

सावली पोलिसांकडून तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सावली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप पुल्लूरवार यांच्या मार्गदर्शनाखाली अपघाताचा तपास सुरू असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील चौकशी करण्यात येत आहे.

एसटी प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत जुन्या बसेसची तांत्रिक तपासणी करूनच त्या मार्गावर धाववाव्यात, अशी मागणी आता प्रवाशांकडून जोर धरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *