पाणीटंचाई येण्याची वाट पाहू नका; आतापासूनच उपाययोजना करा!

पाणीटंचाई येण्याची वाट पाहू नका; आतापासूनच उपाययोजना करा!

उन्हाळ्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांचा प्रशासनाला अलर्ट; गडचिरोली-चामोर्शीवर विशेष लक्ष, मंजूर पाणीपुरवठा कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

एप्रिलपासून टंचाईची शक्यता; गावनिहाय नियोजन, विहिरींची स्वच्छता आणि बोअरपंपांच्या देखभाल-दुरुस्तीला प्राधान्य

आनंद दहागावकर | गडचिरोली

आगामी उन्हाळ्यात ग्रामीण भागात पाणीटंचाईची झळ नागरिकांना बसू नये आणि प्रत्येक गावाला नियमित पाणीपुरवठा उपलब्ध राहावा, यासाठी पाणीटंचाई निर्माण होण्याची वाट न पाहता आतापासूनच प्रभावी नियोजन करून प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घ्या, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा पाणी व स्वच्छता समितीची बैठक जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या ब…

आगामी उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाईचा आढावा घेण्यात आला. बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. विविध तालुक्यांतील अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले.

गडचिरोली-चामोर्शीवर विशेष लक्ष

दुष्काळग्रस्त गडचिरोली आणि चामोर्शी तालुक्यांमध्ये आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन विशेष दक्षता बाळगावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

नागरिकांकडून पाणीटंचाईच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा त्यापूर्वीच गावनिहाय परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक नियोजन करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. संभाव्य टंचाईग्रस्त गावांची माहिती घेऊन तेथे आवश्यक त्या उपाययोजना वेळेत पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले.

मंजूर कामे प्रलंबित ठेवू नका

यापूर्वीच मान्यता देण्यात आलेल्या पाणीपुरवठाविषयक उपाययोजनांची कामे अद्याप प्रलंबित असल्याचे बैठकीत निदर्शनास आले. यावर जिल्हाधिकारी पंडा यांनी नाराजी व्यक्त केली.

मंजूर झालेली कामे कागदावर न ठेवता प्रत्यक्षात तातडीने सुरू करून निर्धारित वेळेत पूर्ण करा, अशा स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. पाणीटंचाईच्या काळात नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी प्रशासनाने कामाच्या गतीला प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

एप्रिलपासून टंचाईची शक्यता

सद्यस्थितीत जिल्ह्यात पाणीटंचाईबाबत कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नसल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. मात्र, एप्रिल महिन्यापासून काही भागांत पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता संबंधित अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

या पार्श्वभूमीवर संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आतापासूनच सुरू करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.

विहिरी, बोअरपंपांच्या देखभालीवर भर

उन्हाळ्यात पाणीटंचाई तीव्र होण्यापूर्वी विहिरींची स्वच्छता, बोअरपंपांची देखभाल व दुरुस्ती यांसारख्या उपाययोजना करण्याबाबत नागरिकांना आवश्यक सूचना देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले.

गावागावातील उपलब्ध जलस्रोतांची स्थिती तपासून त्यांची कार्यक्षमता कायम ठेवणे, पाणीपुरवठा यंत्रणेत अडथळे निर्माण होऊ नयेत यासाठी आवश्यक दुरुस्ती करणे आणि संभाव्य टंचाईच्या काळात पर्यायी उपाययोजना तयार ठेवणे, या बाबींवर प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे.

‘तक्रारीनंतर नव्हे, टंचाईपूर्वीच प्रशासन सज्ज हवे’

उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर धावपळ करण्याऐवजी टंचाईपूर्व नियोजनाला प्राधान्य देणे, हीच या बैठकीची प्रमुख दिशा ठरली. विशेषतः दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये पाणीपुरवठ्याची यंत्रणा सक्षम ठेवणे आणि मंजूर कामे वेळेत पूर्ण करणे यावर जिल्हाधिकारी पंडा यांनी प्रशासनाला स्पष्टपणे बजावले.

नागरिकांना उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये, यासाठी प्रशासनाने आतापासूनच कंबर कसली असून, गावनिहाय नियोजन आणि आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *