विजय निकम नंदुरबार दिव्यांगांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय प्रतिनिधित्व द्या! संजय गांधी निराधार योजनेचे मानधन ६ हजार रुपये करण्याची मागणी; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन…

दिव्यांग बांधवांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नामनिर्देशनाद्वारे राजकीय प्रतिनिधित्व मिळावे, तसेच संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत मिळणाऱ्या मासिक अनुदानात वाढ करून ते १ हजार ५०० रुपयांवरून ६ हजार रुपये करण्यात यावे, या प्रमुख मागण्यांसाठी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय शांततापूर्ण धरणे आंदोलन करण्यात आले.
राष्ट्रीय दिव्यांग/अपंग विकास महासंघ (महाराष्ट्र राज्य, जिल्हा शाखा नंदुरबार) आणि महाराष्ट्र दिव्यांग राजकीय प्रतिनिधित्व अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.
दिव्यांग व्यक्तींना केवळ शासकीय योजनांचे लाभार्थी न ठेवता समाजाच्या विकासासह प्रशासनाच्या निर्णयप्रक्रियेतही त्यांना थेट सहभाग मिळावा, हा आंदोलनामागील प्रमुख उद्देश होता. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगरपरिषद आणि महानगरपालिका अशा सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिव्यांगांना नामनिर्देशनाद्वारे प्रतिनिधित्व देण्यात यावे, अशी मागणी आंदोलकांनी केली.
यापूर्वी ३ ऑक्टोबर २०२६ रोजी मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन या मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्यात आल्या होत्या. तसेच २ नोव्हेंबर २०२६ रोजी मुख्यमंत्री सचिवालय, मंत्रालय येथे सादर केलेल्या पूरक निवेदनाद्वारे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे मासिक मानधन १,५०० रुपयांवरून ६,००० रुपये करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दिव्यांग बांधवांना सन्मानाने जगता यावे, त्यांना राजकीय आणि सामाजिक निर्णयप्रक्रियेत योग्य स्थान मिळावे तसेच आर्थिक आधार मजबूत व्हावा, यासाठी शासनाने या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या धरणे आंदोलनात संघटनेचे पदाधिकारी, सदस्य आणि जिल्ह्यातील दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. लोकशाही मार्गाने पार पडलेल्या या आंदोलनातून दिव्यांगांच्या हक्कांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *