५४ गावांच्या पाणीप्रश्नाला निर्णायक दिशा! मार्चपासून सर्वेक्षणास सुरुवात; २०० कोटींच्या निविदेची प्रक्रिया पूर्ण आमदार राजेशदादा विटेकर यांच्या तीन वर्षांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला महत्त्वपूर्ण यश; ५४ गावांना पिण्याचे पाणी व सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न परभणी/प्रतिनिधी :- रमेश मुलगीर

परभणी/प्रतिनिधी :- रमेश मुलगीर

परभणी आणि मानवत तालुक्यातील ५४ माथ्यावरील गावांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्नाच्या सोडवणुकीच्या दिशेने आता महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. या गावांना पिण्याच्या पाण्यासह सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मंत्रालयात जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ५४ गावांच्या पाणीप्रश्नाला निर्णायक दिशा देण्यासह मार्च महिन्यापासून सर्वेक्षण व अन्वेषणाची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच या कामासाठी २०० कोटी रुपयांच्या निविदेची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली.

आमदार राजेशदादा विटेकर यांनी मागील तीन वर्षांपासून या गंभीर पाणीप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना आता महत्त्वपूर्ण यश मिळताना दिसत आहे. कोकणातील पश्चिमवाहिनी नदी खोऱ्यातील अतिरिक्त पाणी मराठवाड्यात वळविण्यासाठी तयार करण्यात येत असलेल्या एकात्मिक जल आराखड्यात परभणी व मानवत तालुक्यांतील ५४ गावांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेच्या अनुषंगाने मार्च महिन्यापासून सर्वेक्षण आणि तांत्रिक अन्वेषणाचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

बैठकीदरम्यान ५४ गावांच्या वतीने सविस्तर निवेदन, सर्व ग्रामपंचायतींचे ठराव तसेच प्रत्येक गावाची पाण्याची गरज आणि भौगोलिक परिस्थिती दर्शविणारी स्वतंत्र प्रपत्रे जलसंपदामंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आली. या माध्यमातून संबंधित गावांतील पाणीटंचाईची वस्तुस्थिती आणि भविष्यातील पाण्याची आवश्यकता शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली.

या योजनेसाठी सुमारे ६० दशलक्ष घनमीटर म्हणजेच २.१२ टीएमसी पाण्याची आवश्यकता लक्षात घेऊन विविध जलस्रोतांच्या पर्यायांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये गोदावरी नदी, दूधना नदी, निम्न दूधना प्रकल्प, जायकवाडी डावा कालवा तसेच कोकणातून मराठवाड्यात वळविण्यात येणाऱ्या अतिरिक्त पाण्याच्या पर्यायांचा समावेश आहे. या सर्व पर्यायांचा तांत्रिक आणि व्यवहार्य दृष्टिकोनातून विचार करून ५४ गावांच्या पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याबाबत चर्चा झाली.

यावेळी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार राजेशदादा विटेकर यांच्या तीन वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे कौतुक केले. तसेच परभणी व मानवत तालुक्यांतील ५४ गावांचा कायमस्वरूपी पाणीप्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. त्यामुळे अनेक वर्षांपासून पाण्याच्या समस्येला सामोरे जाणाऱ्या गावांतील नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.

या महत्त्वपूर्ण बैठकीस जिल्हा परिषद सदस्य संग्राम जामकर, ५४ गाव संघर्ष समितीचे संतोष देशमुख, रोहन सामाले, माऊली कदम, सचिन पठाडे यांच्यासह जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सर्वेक्षणापुरते मर्यादित न राहता शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचविण्याचे ध्येय!

५४ गावांच्या पाणीप्रश्नासाठी सर्वेक्षण सुरू होणे हा निश्चितच महत्त्वाचा टप्पा आहे. मात्र, आमचे अंतिम ध्येय केवळ सर्वेक्षणापुरते मर्यादित नसून प्रत्येक गावातील शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचविणे हेच आहे. त्यासाठी निश्चित जलस्रोताची निवड, आवश्यक तांत्रिक मान्यता आणि कालबद्ध पद्धतीने योजनेची अंमलबजावणी करण्याचा आमचा आग्रह कायम राहणार आहे, अशी भूमिका यावेळी स्पष्ट करण्यात आली.

एकूणच, ५४ गावांच्या पाणीप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी झालेली ही महत्त्वपूर्ण बैठक परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ आणि आगामी पिढ्यांसाठी आशादायी ठरणारी आहे. ही योजना नियोजित वेळेत पूर्णत्वास गेल्यास या गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यासोबतच शेती आणि ग्रामीण विकासालाही मोठी चालना मिळू शकते.

५४ गावांना पाणी मिळाले पाहिजे, शेती समृद्ध झाली पाहिजे आणि या गावांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, हाच आमचा सामूहिक निर्धार आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *