तब्बल 27 वर्षानंतर प्रथमच परिक्षेत्रीय क्रीडा पोलीस स्पर्धेचे आयोजन; शांतता, सुरक्षितता आणि विकासाच्या दिशेने गडचिरोलीची वाटचाल
• गडचिरोली पोलीस कवायत मैदान, जिल्हा परिषद मैदान, जिल्हा क्रिडा संकुल येथे रंगणार 20 क्रीडा प्रकार स्पर्धा
• गडचिरोली जिल्ह्रातील दहशतीचे वातावरण संपूष्टात आले असून अधिकारी व अंमलदार यांच्या वैयक्तीक कला गुणांना वाव मिळून सर्वांमध्ये खेळाडूवृत्ती, शिस्त व सांघीक भावना निर्माण होण्यासाठी या खेळांच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत … पोलीस अधीक्षक , गडचिरोली एम रमेश
पोलीस दलाचे दैनंदिन कामकाज अत्यंत जबाबदारीचे व आव्हानात्मक असते. अशा व्यस्त कामकाजातून खेळाडूंना क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून आपले कौशल्य, क्षमता व गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी उपलब्ध करून देणे, तसेच पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांच्या अंगी असलेल्या क्रीडागुणांना प्रोत्साहन देणे, त्यांच्यामध्ये खेळाडूवृत्ती, सांघिक भावना, शिस्त व नेतृत्वगुण विकसित करण्याच्या उद्देशाने दरवर्षी परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. याच पाश्र्वभूमीवर यावर्षी गडचिरोली व नागपूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेचे आयोजन दिनांक 29 नोव्हेंबर 2026 ते 04 डिसेंबर 2026 रोजी गडचिरोली येथे पार पडणार आहे.
क्रीडा स्पर्धेमध्ये गडचिरोली व नागपूर परिक्षेत्रातील 06 पोलीस घटकांतील अधिकारी व अंमलदार उत्स्फूर्तपणे सहभागी होणार आहे. यजमान गडचिरोली जिल्ह्रासह नागपूर ग्रामीण, गोंदिया, भंडारा, वर्धा व चंद्रपूर अशा 06 पोलीस घटकांतील 900 हून अधिक खेळाडू या क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्या खेळाची चमक दाखविणार आहे. या क्रीडा स्पर्धेमध्ये विविध मैदानी व सांघिक क्रीडा प्रकारांमध्ये खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळणार असून यामध्ये फुटबॉल, अॅथलेटिक्स (महिला व पुरुष), कबड्डी (महिला व पुरुष), खो-खो (महिला व पुरुष), व्हॉलीबॉल (महिला व पुरुष), बास्केटबॉल (महिला व पुरुष), क्रॉस कंट्री (महिला व पुरुष) आणि जलतरण आदी एकूण 20 क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आलेला आहे.
या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन दिनांक 29 नोव्हेंबर 2026 रोजी मशाल प्रज्वलीत करुन करण्यात आले. तसेच पोलीस अधीक्षक, गडचिरोली एम. रमेश यांनी सर्व जिल्ह्रांच्या खेळाडूंचे स्वागत करुन मार्गदर्शन केले. या स्पर्धांच्या माध्यमातून पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यातील क्रीडा स्पर्धेला चालना मिळण्यासोबतच परस्परांमध्ये समन्वय, बंधुभाव व संघभावना वृद्धिंगत होण्यास मदत होणार आहे. या क्रीडा स्पर्धेच्या अनुषंगाने पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या 20 समित्या स्थापन करण्यात आल्या असून सदर समित्यांच्या माध्यमातून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या क्रीडा स्पर्धेचे काटेकोरपणे नियोजन करण्यात येत आहे.
सदर स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदिप पाटील, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र योगेशकुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस अधीक्षक, गडचिरोली एम.रमेश यांच्या नेतृत्वात, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तीक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., अपर पोलीस अधीक्षक, अहेरी हर्षवर्धन बी.जे., सहायक पोलीस अधीक्षक, गडचिरोली सुशयकुमार सिंग, सहायक पोलीस अधीक्षक, भामरागड सागर भामरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, जिमलगट्टा राहुल मडावी, पोलीस उप-अधीक्षक (गृह) शैलेंद्र ठाकरे यांच्यासह जिल्ह्रातील सर्व अधिकारी व अंमलदार परिश्रम घेत आहेत.
————————–
गडचिरोली सबादाता आशिफ़ कुरेशी

