नायलॉन मांजा वापराल तर थेट ₹२५ हजारांचा दंड! विक्री-साठवणूक करणाऱ्यांवर तब्बल ₹२.५० लाखांचा दंड; गडचिरोली पोलिसांचा कडक इशारा

उच्च न्यायालयाच्या निर्देशांची कठोर अंमलबजावणी; अल्पवयीनांकडून मांजाचा वापर आढळल्यास पालकांकडून दंड वसूल

आनंद दहागावकर,

गडचिरोली | दि. २९ नोव्हेंबर २०२६

मकरसंक्रांती आणि पतंगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजाचा वापर, विक्री व साठवणूक करणाऱ्यांविरुद्ध गडचिरोली पोलीस दलाने कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. नायलॉन मांजामुळे नागरिक, लहान मुले, दुचाकीस्वार तसेच पशुपक्षी गंभीर जखमी होण्याच्या घटना घडत असून, काही प्रकरणांत जीवितहानीदेखील झाल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

मा. उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ, नागपूर यांनी एस.एम.पी.आय.एल. क्रमांक ०१/२०२१ प्रकरणात दि. १२ जानेवारी २०२६ रोजी दिलेल्या आदेशानुसार नायलॉन मांजाचा वापर, विक्री आणि साठवणुकीवर नियंत्रण आणण्यासाठी दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्देशांची गडचिरोली जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

पतंग उडवताना नायलॉन मांजा वापरला तर ₹२५ हजार दंड!

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नायलॉन मांजाचा वापर करून पतंग उडविताना कोणी आढळल्यास प्रत्येक उल्लंघनासाठी ₹२५ हजारांचा दंड आकारण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे, अल्पवयीन व्यक्तीकडून नायलॉन मांजाचा वापर होत असल्याचे आढळल्यास हा दंड संबंधित पालकांकडून वसूल करण्यात येणार आहे.

विक्री-साठवणूक करणाऱ्यांना ₹२.५० लाखांचा दणका

नायलॉन मांजाची विक्री अथवा विक्रीच्या उद्देशाने त्याची साठवणूक करणाऱ्यांवर आणखी कठोर कारवाई करण्यात येणार आहे. प्रत्येक उल्लंघनासाठी तब्बल ₹२ लाख ५० हजारांचा दंड आकारण्यात येणार असल्याचे गडचिरोली पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

दंडाची रक्कम लोककल्याण खात्यात (Public Welfare Account) जमा करण्यात येणार आहे.

दंड न भरल्यास महसूल विभागामार्फत वसुली

संबंधित व्यक्तीने दंडाची रक्कम भरण्यात कसूर केल्यास त्यांना १५ दिवसांची नोटीस देण्यात येईल. त्यानंतरही दंडाची रक्कम जमा न केल्यास सक्षम प्राधिकरणामार्फत महसूल विभागाच्या माध्यमातून दंडाची रक्कम वसूल करण्यात येणार आहे.

नायलॉन मांजा जीवघेणा; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

नायलॉन मांजा सहज न तुटणारा आणि अत्यंत धारदार असल्याने तो मानवी जीवितासह पशुपक्ष्यांच्या सुरक्षिततेसाठी गंभीर धोका निर्माण करतो. पतंगोत्सवाच्या काळात रस्त्यावरून जाणारे दुचाकीस्वार, पादचारी, लहान मुले तसेच पक्षी यांना या मांजामुळे गंभीर दुखापत होण्याची शक्यता असते.

त्यामुळे नागरिकांनी नायलॉन मांजाचा वापर पूर्णपणे टाळावा आणि पतंगोत्सव साजरा करताना स्वतःसह इतर नागरिक व पशुपक्ष्यांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

माहिती मिळाल्यास पोलिसांना कळवा

नायलॉन मांजाचा वापर, विक्री किंवा साठवणूक होत असल्याची माहिती अथवा तक्रार असल्यास नागरिकांनी जवळच्या पोलीस ठाण्यात, गडचिरोली पोलीस नियंत्रण कक्षाच्या अधिकृत संपर्क क्रमांकावर किंवा डायल ११२ वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही सार्वजनिक सूचना प्रसिद्ध करण्यात आली असून, उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर तसेच दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

“नायलॉन मांजा टाळा; प्रशासनाला सहकार्य करा!”

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व नागरिक, पतंग विक्रेते आणि पालकांनी नायलॉन मांजाचा वापर, विक्री व साठवणूक टाळून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी केले आहे.

पतंगोत्सव हा आनंदाचा उत्सव आहे; मात्र त्यासाठी नागरिकांच्या जीविताला किंवा पशुपक्ष्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ नये, यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागावे, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आता गडचिरोली जिल्ह्यात नायलॉन मांजाविरोधात पोलिसांची कडक नजर राहणार असून, नियम मोडणाऱ्यांवर थेट आर्थिक दंडाची कारवाई होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *