निष्काळजीपणा, दुर्लक्ष आणि हयगय अजिबात खपवून घेणार नाही!” — अधिकाऱ्यांना आमदारांचा थेट इशारा
आनंद दहागावकर! गडचिरोली…..
अहेरी | दि. २८ नोव्हेंबर २०२६ ; अहेरी पंचायत समितीची वार्षिक आमसभा शुक्रवारी, दि. २७ नोव्हेंबर रोजी विविध ज्वलंत प्रश्नांनी चांगलीच गाजली. रखडलेली विकासकामे, अहेरी शहरातील रस्ता रुंदीकरण व अतिक्रमणाचा प्रश्न, शेतकऱ्यांची दुष्काळसदृश्य परिस्थिती, शिक्षण, आरोग्य, सिंचन, रस्ते, पिण्याचे पाणी, एस.टी. बससेवा आणि विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीवर आमसभेत सविस्तर चर्चा झाली. यावेळी अधिकाऱ्यांच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करत आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
आमसभेच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रविंद्र ओल्लालवार, माजी उपाध्यक्ष रविंद्र बाबा आत्राम, तहसीलदार बालाजी सोमवंशी, संवर्ग विकास अधिकारी महेश वाढई, मुख्याधिकारी मिथुन नर्मलवार, सहायक पोलिस निरीक्षक पटले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) कार्यकारी जिल्हाध्यक्ष रियाज शेख, विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार, तालुकाध्यक्ष नागेश मडावी आदी मान्यवर उपस्थित होते.
रखडलेल्या कामांवर आमदारांची नाराजी
आमसभेच्या सुरुवातीला मागील आमसभेचे इतिवृत्त वाचण्यात आले. त्यानंतर प्रलंबित व रखडलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. अनेक कामे दीर्घकाळापासून प्रलंबित असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
“विकासकामे वेळेत पूर्ण झाली पाहिजेत. नागरिकांना वारंवार कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत,” अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.
अहेरीच्या मुख्य रस्त्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
अहेरी शहरातील मुख्य रस्त्याचे रुंदीकरण आणि अतिक्रमणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याचा मुद्दा नागरिकांनी आमसभेत उपस्थित केला.
या प्रश्नावर आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना जाब विचारत अतिक्रमणे हटवून रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश दिले.
नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीशी संबंधित हा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित राहणे योग्य नसून, संबंधित विभागाने आता ठोस कार्यवाही करावी, अशी आक्रमक भूमिका आमदारांनी घेतली.
अहेरीसह उपविभागातील पाचही तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी
यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, अहेरी तालुक्यासह संपूर्ण अहेरी उपविभागात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचा मुद्दा आमसभेत उपस्थित करण्यात आला.
सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोणे तसेच शेतकरी बांधवांनी शेतकऱ्यांवर वाढत असलेल्या कर्जाच्या ओझ्याकडे लक्ष वेधत अहेरी आणि अहेरी उपविभागातील पाचही तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्याची तीव्र मागणी केली.
शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन शासनस्तरावर तातडीने पाठपुरावा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
शिक्षणापासून घरकुलापर्यंत; प्रत्येक योजनेचा आढावा
आमसभेत शिक्षण, सिंचन, आरोग्य, कृषी, विद्युत, पोषण आहार, रस्ते, पुलिया, पिण्याचे पाणी, एस.टी. बससेवा, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, घरकुल योजना तसेच विविध विकासकामांवर चर्चा करण्यात आली.
शासनाच्या विविध योजना व सुविधा पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचल्या पाहिजेत. कोणताही नागरिक शासनाच्या योजना व सुविधांपासून वंचित राहू नये, यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी दिल्या.
“निष्काळजीपणा अजिबात खपवून घेणार नाही!”
अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहून वेळेत कार्यवाही करावी. विकासकामांच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड केली जाऊ नये, अशी स्पष्ट भूमिका आमदारांनी घेतली.
“निष्काळजीपणा, दुर्लक्ष आणि कामात हयगय अजिबात खपवून घेतली जाणार नाही. नागरिकांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहा आणि रखडलेली कामे तातडीने मार्गी लावा,” असा तंबीवजा इशारा आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला.
अहेरीच्या विकासाचा वेग वाढविण्यासोबतच शेतकरी, नागरिक आणि सर्वसामान्य लाभार्थ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आल्याने, आता संबंधित विभागांकडून प्रत्यक्षात किती वेगाने कार्यवाही होते, याकडे अहेरीवासीयांचे लक्ष लागले आहे.

