कार्यासन सोडण्यास नकार, नव्या कर्मचाऱ्यांना पदभार देण्यास टाळाटाळ; वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह
आनंद दहागावकर!
गडचिरोली | दि. २८ नोव्हेंबर २०२६
सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. १, गडचिरोली येथे सन २०२५–२६ च्या बदली सत्रात शासनाने जारी केलेल्या बदली आदेशांच्या अंमलबजावणीवरून गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. शासनाच्या आदेशानुसार काही कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले असतानाही संबंधित कर्मचारी पूर्वीचे कार्यासन व पदभार सोडण्यास तयार नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याचवेळी नव्याने बदली होऊन रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यासनाचा ताबा देण्यात येत नसल्याची तक्रार समोर आली आहे.
या संपूर्ण प्रकारामुळे “शासनाचा आदेश मोठा की कर्मचाऱ्यांची मनमानी?” असा सवाल उपस्थित होत असून, सार्वजनिक बांधकाम विभागातील प्रशासकीय कारभारावरच संशयाची छाया निर्माण झाली आहे.
जनकल्याण समाज उन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष रामचंद्र ताटीकोंडावार यांनी या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली असून, संबंधित प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर विभागीय व शिस्तभंगविषयक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
बदलीनंतरही जुने कार्यासन का सोडले जात नाही?
बदली आदेशानुसार कार्यमुक्ती झाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांनी पूर्वीचे कार्यासन व पदभार सोडणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात काही कर्मचारी अद्यापही त्याच पदभारावर किंवा कार्यासनाशी संबंधित कामकाजात हस्तक्षेप करीत असल्याची तक्रार आहे. दुसरीकडे, नव्याने बदली होऊन रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियोजित कार्यासनाचा ताबा मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकारामुळे कार्यालयीन कामकाजात प्रशासकीय विस्कळीतपणा निर्माण होण्याची शक्यता असून, शासनाच्या बदली आदेशांच्या अंमलबजावणीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
‘वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अभय आहे का?’
या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देऊनही अपेक्षित ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप ताटीकोंडावार यांनी केला आहे.
“शासनाच्या आदेशापेक्षा संबंधित कर्मचारी मोठे झाले आहेत काय? बदली झाल्यानंतरही पूर्वीचे कार्यासन सोडले जात नसेल, तर त्यामागे नेमके कोणाचे पाठबळ आहे? वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मौनामुळेच ही मनमानी सुरू आहे काय?” असे सवाल उपस्थित करत त्यांनी संपूर्ण प्रशासकीय कार्यप्रणालीची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
आर्थिक व्यवहार आणि शासकीय नस्त्यांचीही चौकशी करण्याची मागणी
कार्यासन व पदभार सोडण्यास विलंब किंवा टाळाटाळ करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांनी कार्यमुक्तीनंतर हाताळलेल्या शासकीय नस्त्या, आर्थिक व्यवहार, कार्यालयीन दस्तऐवज, मंजुरी प्रक्रिया तसेच घेतलेल्या निर्णयांची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच बदली आदेशांची प्रभावी अंमलबजावणी न करणाऱ्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही जबाबदारी निश्चित करण्यात यावी, अशी मागणी ताटीकोंडावार यांनी अधीक्षक अभियंता यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
‘माझे कोणीही काही करू शकत नाही’ अशी भूमिका?
काही कर्मचारी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी असलेल्या जवळच्या संबंधांचा आधार घेत प्रशासनाला जुमानत नसल्याची तक्रार असल्याचे ताटीकोंडावार यांनी म्हटले आहे. त्यामुळे हा प्रकार केवळ बदली आदेशांच्या अंमलबजावणीपुरता मर्यादित नसून, कार्यालयीन शिस्त, पारदर्शकता आणि प्रशासकीय उत्तरदायित्वाचा गंभीर प्रश्न असल्याचे त्यांनी नमूद केले.
मात्र या आरोपांबाबत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची अधिकृत बाजू अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची मागणी जोर धरत आहे.
‘कारवाई नाही तर मंत्रालयापर्यंत तक्रार!’
या प्रकरणाची तातडीने निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. अन्यथा प्रधान सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्याकडे तक्रार करण्यात येईल, असा इशारा संतोष ताटीकोंडावार यांनी दिला आहे.
प्रशासनाकडून ठोस कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
शासनाच्या आदेशांची अंमलबजावणी ही प्रशासनाची मूलभूत जबाबदारी आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपांची सत्यता चौकशीतून समोर येणार का आणि संबंधितांवर शासन कोणती भूमिका घेणार, याकडे आता गडचिरोलीकरांचे लक्ष लागले आहे.
— संतोष रामचंद्र ताटीकोंडावार
जिल्हाध्यक्ष, जनकल्याण समाज उन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समिती, गडचिरोली
