लोणी बु. फाटा ते गुंज खुर्द रस्त्याचे काम १५ नोव्हेंबरपर्यंत सुरू न झाल्यास १६ पासून उपोषण

रवींद्र धर्मे यांचा इशारा”

परभणी/प्रतिनिधी :- रमेश मुलगीर

पाथरी तालुक्यातील मौजे लोणी बु. फाटा ते गुंज खुर्द या अपूर्ण रस्त्याचे काम गेल्या तीन-चार वर्षांपासून अर्धवट अवस्थेत असून रस्ता अतिशय खराब झाला आहे. याबाबत वारंवार निवेदन देऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उडवा-उडवीची उत्तरे दिली जात आहेत. तरी दि. १५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत या रस्त्याचे काम सुरू न झाल्यास आम्ही लोणीकर ग्रामस्थ सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय, पाथरी समोर दि. १६ नोव्हेंबर २०२६ पासून उपोषणास बसणार आहोत, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे परभणी जिल्हाप्रमुख रवींद्र रामकिशन धर्मे यांनी दिला आहे.
यासंदर्भात त्यांनी आज दि. ०२.११.२०२६ रोजी मा. उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, पाथरी यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, आपण दिलेल्या पत्र दि. १७.०४.२०२५ व कोहीनूर कन्स्ट्रक्शन यांनी दिलेल्या हमीपत्रामुळे मागील उपोषण तात्पुरते स्थगित केले होते. मात्र अद्यापही काम सुरू झालेले नाही. लोणी गावात या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून लहान मुले, रुग्णांना त्रास होत आहे. गावात मोठ्या प्रमाणात धुळीमुळे अनेकांना श्वसनाचे आजार झाले आहेत. पावसाळ्यात चिखल होऊन अनेक मोटारसायकल स्लिप होऊन अपघात झाले आहेत.
तिर्थक्षेत्र गुंज खुर्द येथे जाणारे भाविक मोठ्या प्रमाणात याच रस्त्याने प्रवास करतात, त्यांना या नादुरुस्त रस्त्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. तसेच कानसुर, उमरा, गोंडगाव, अंधापुरी व लोणी येथील नारीकांना देखील याच जीवघेण्या रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे.
जर दि. १५ नोव्हेंबर पर्यंत काम सुरू न झाल्यास दि. १६ नोव्हेबर पासून उपोषण करण्यात येईल व उपोषणादरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास आपण सर्वस्वी जबाबदार राहाल, याची नोंद घ्यावी, असे निवेदनात नमूद केले आहे.
या निवेदनावर रवींद्र धर्मे, रंजित गिराम, प्रकाशराव धर्मे, भगवान धर्मे, कारभारी गवारे, दिंगांबर चिद्रावार, विनायक मोरे, प्रल्हाद धर्मे, गजानन धर्मे, जगन्नाथ बादाडे, प्रदूमन कदम, नवनाथ गिराम, शिवराम धर्मे, अमोल धर्मे, व बाबासाहेब धर्मे यांच्यासह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या निवेदनाची प्रत उपजिल्हाधिकारी, तहसीलदार व पोलीस निरीक्षक, पाथरी यांना माहितीस्तव देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *