धर्मे यांच्या आमरण उपोषणाच्या इशाऱ्यानंतर लोणी बु.चा पाणीपुरवठा अखेर सुरू “तीन वर्षांपासून पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती थांबली; जिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे यांच्या पाठपुराव्याला यश, चार तांड्यांनाही मोठा दिलासा”! परभणी/प्रतिनिधी : रमेश मुलगीर

पाथरी : तालुक्यातील मौजे लोणी बु. येथील गेल्या तीन वर्षांपासून रखडलेला जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा अखेर सुरू झाला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे परभणी जिल्हाप्रमुख रवींद्र रामकिशन धर्मे यांनी या गंभीर प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत संबंधित प्रशासनाला आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. त्यांच्या या इशाऱ्याची प्रशासनाने दखल घेत शनिवार, दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी गावातील पाणीपुरवठा सुरू केला. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या लोणी बु. येथील ग्रामस्थांसह गावांतर्गत येणाऱ्या चार तांड्यांमधील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
तीन वर्षांपासून जलजीवन मिशनचे काम रखडले!
केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घराला नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र, लोणी बु. येथे या योजनेचे काम मागील तीन वर्षांपासून रखडले होते. परिणामी, गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. सध्या पावसाने दडी मारल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, गावातील विहिरी, बोअरवेल आणि इतर जलस्रोत कोरडे पडले होते. त्यामुळे पाणीटंचाईची समस्या अधिकच गंभीर बनली होती.
तरुगव्हाण बंधाऱ्यात पाणी असूनही ग्रामस्थ तहानलेले!
विशेष म्हणजे, तरुगव्हाण बंधाऱ्यातील विहिरीमध्ये मुबलक पाणी उपलब्ध असतानाही केवळ संबंधित ठेकेदाराच्या उदासीनतेमुळे आणि कामातील निष्क्रियतेमुळे ग्रामस्थांना पिण्याचे पाणी मिळत नव्हते. पाण्याचा स्रोत उपलब्ध असतानाही केवळ रखडलेल्या कामामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती.
१४ ऑक्टोबर रोजी प्रशासनाला दिले होते निवेदन!
या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे परभणी जिल्हाप्रमुख रवींद्र रामकिशन धर्मे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य रणजित जिजाभाऊ गिराम यांनी १४ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, परभणी येथील कार्यकारी अभियंत्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले होते.
या निवेदनातून लोणी बु. येथील जलजीवन मिशनअंतर्गत रखडलेले पाणीपुरवठा योजनेचे काम तातडीने पूर्ण करून नागरिकांना नियमित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच आठ दिवसांच्या आत काम पूर्ण करून पाणीपुरवठा सुरू न केल्यास १ नोव्हेंबर २०२६ पासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला होता.
या आंदोलनाच्या इशाऱ्याची विविध प्रसारमाध्यमांनी दखल घेत वृत्त प्रसिद्ध केल्याने हा पाणीप्रश्न चर्चेत आला होता.
प्रशासनाची धावपळ; ठेकेदाराला काम पूर्ण करण्याचे आदेश!
जिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे यांनी दिलेल्या आमरण उपोषणाच्या इशाऱ्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेतली. संबंधित ठेकेदाराला आवश्यक आदेश देऊन रखडलेले काम युद्धपातळीवर पूर्ण करून घेण्यात आले. त्यानंतर शनिवार, दिनांक ३१ ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू करण्यात आला.
ग्रामस्थांकडून समाधान; कायमस्वरूपी काम पूर्ण करण्याची मागणी!
गेल्या तीन वर्षांपासून पाण्यासाठी करावी लागणारी धावपळ अखेर थांबल्याने लोणी बु. येथील ग्रामस्थांसह चार तांड्यांतील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या प्रश्नावर सातत्याने पाठपुरावा करून प्रशासनाचे लक्ष वेधल्याबद्दल जिल्हाप्रमुख रवींद्र रामकिशन धर्मे यांचे ग्रामस्थांनी आभार मानले आहेत.
मात्र, केवळ पाणीपुरवठा सुरू करून प्रशासनाने समाधान मानू नये. जलजीवन मिशनअंतर्गत संपूर्ण योजनेचे उर्वरित काम दर्जेदार आणि कायमस्वरूपी पूर्ण करावे. पाणीपुरवठा नियमित सुरू राहील, याची संबंधित विभागाने दक्षता घ्यावी. भविष्यात पुन्हा पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ ग्रामस्थांवर येऊ नये, यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी लोणी बु. येथील ग्रामस्थांतून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *