पैठण शहरातील कुरेशी मोहल्ला परिसरात अवैध गोवंश कत्तल आणि मांस विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच पैठण पोलिसांनी शुक्रवारी (दि. ३० ऑक्टोबर) छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत सुमारे २ लाख १० हजार रुपये किमतीचे गोमांस, कत्तलीचे अवशेष, सत्तूर, सुरे तसेच जिवंत गोवंश जनावरे जप्त करण्यात आली. या प्रकरणी शब्बीर रशीद कुरेशी, जाफर सलाम कुरेशी, रफीक हसन कुरेशी यांच्यासह इतरांविरुद्ध पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक ऋषिकेश संभाजी तळेकर हे पैठण पोलीस ठाण्यात बीट क्रमांक १ चे अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी सकाळी ते पेट्रोलिंगवर असताना कुरेशी मोहल्ला परिसरात बेकायदेशीर गोवंश कत्तल करून मांस विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे पंच व पोलीस पथकासह संबंधित ठिकाणी छापा टाकण्यात आला. यावेळी आरोपींच्या घरामागील परिसरात गोवंश जनावरांची कत्तल करून मांस विक्री केली जात असल्याचे तसेच जिवंत गोवंश जनावरांना चारा-पाण्याविना बांधून ठेवल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ऋषिकेश संभाजी तळेकर करीत आहेत.
———————————————-
२ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त
छाप्यादरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे २ लाख १० हजार रुपये किमतीचे गोमांस, कत्तल केलेल्या जनावरांचे अवशेष, सत्तूर, सुरे आणि जिवंत गोवंश जनावरे जप्त केली. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मांसाचे नमुने सी.ए. चाचणीसाठी घेण्यात आले. त्यानंतर उर्वरित मांसाची नियमानुसार विल्हेवाट लावण्यात आली.
———————————————-
विविध कायद्यांनुसार गुन्हा दाखल
या प्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ तसेच प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
