हदगाव शहरातील पंचशील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुरुवार, दि. २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे
सचिव सुनील हरिहरराव सोनुले, संचालक जगदीश कदम व मुख्याध्यापक अनिल दस्तूरकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधानाचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
शिक्षक अमररत्न वाढवे यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व विशद केले. सहशिक्षिका सारिका बारसे व विद्यार्थ्यांनी सामूहिक संविधान वाचन केले. यानिमित्त विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील संविधान प्रतिकृतीला पुष्पहार अर्पण करून संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.
प्रभात फेरीनंतर शाळेत विद्यार्थी व शिक्षकांनी मानवी साखळी तयार करून न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता या संविधानिक मूल्यांचा संदेश दिला. तसेच दिवाणी व फौजदारी न्यायालयातील अधिवक्ता धम्मपाल पाईकराव यांचे भारतीय संविधान या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
