मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात नयाकुंड ग्रामपंचायतीचा नागपुर जिल्हास्तरावर तृतीय पुरस्काराने गौरव नागपूर विभागीय पुरस्कार वितरण सोहळ्यातनयाकुंड गावाची उल्लेखनीय कामगिरी; गावाच्या विकासासाठी २० लाख रुपयांचा निधी मिळणार

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५-२६ अंतर्गत नागपूर विभागाच्या विभागस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये नयाकुंड ग्रामपंचायतीने उल्लेखनीय कामगिरी करत तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त केला. या यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नयाकुंड गावाला नागपुर जिल्ह्यातून तृतीय पुरस्कार मिळाल्याबद्दल गावचे सरपंच सुधीरजी अवस्थी यांच्यासह सर्व ग्रामस्थांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. तसेच गावाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणारे ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामपंचायत सचिव मॅडम आणि सर्व पदाधिकारी यांचेही विशेष कौतुक करण्यात आले. पुरस्कार वितरण सोहळ्याला नयाकुंड गावातील कर्मचारी, सचिव मॅडम आणि संबंधित मान्यवर उपस्थित होते.

या पुरस्काराच्या माध्यमातून नयाकुंड गावाच्या सर्वांगीण विकासासाठी २० लाख रुपयांचा निधीचे पुरस्कार म्हणून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या निधीमुळे गावातील विविध विकासकामांना गती मिळणार असून पायाभूत सुविधा, स्वच्छता, ग्रामविकास आणि नागरिकांच्या मूलभूत सोयीसुविधांमध्ये सुधारणा करण्यास मदत होणार आहे.

या कार्यक्रमाला महसूल मंत्री तथा पालकमंत्री नागपूर चंद्रशेखर बावनकुळे ,ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, राज्यमंत्री योगेश रामदास कदम, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार चरणसिंग ठाकूर, आमदार करण संजय देवतळे, आमदार राजीव पोतदार , माजी आमदार टेकचंद सावरकर,सचिव ग्राम विकास व पंचायतराज डॉ .चंद्रकांत पुलकुंडवार,अतिरिक्त आयुक्त श्रीमती वर्षा गौरकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कमलकिशोर फुटाणे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत कपिलनाथ कलोडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

ग्रामविकास, लोकसहभाग आणि पारदर्शक प्रशासनाच्या माध्यमातून नयाकुंड गावाने मिळवलेले हे यश निश्चितच इतर ग्रामपंचायतींसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. या यशाबद्दल सरपंच सुधीरजी अवस्थी, ग्रामपंचायत अधिकारी, प्रियंका बोरकर ,गट विकास अधिकारी सुभाष जाधव,विस्तार अधिकारी प्रभाकर वाघ, यशवंत लिखार, ग्राम पंचायत कर्मचारी आणि समस्त नयाकुंड ग्रामस्थांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *