पाडळशिंगीतील रास्ता रोको प्रकरण; विवेकानंद पाटील, शेतकरी नेते रविराज साबळे पाटील यांच्यासह २५० जणांवर गुन्हे दाखल
ऊस दराच्या मागणीसाठी दोन तास महामार्ग रोखला; धुळे-सोलापूर महामार्गावर दहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
गेवराई प्रतिनिधी : शेतकऱ्यांच्या ऊसाला प्रतिटन ४ हजार २०० रुपये दर मिळावा, तसेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी गेवराई तालुक्यातील पाडळशिंगी टोलनाका येथे करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनप्रकरणी पोलिसांनी २५० आंदोलकांविरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये एमपीएससी आंदोलनातून राज्यभरात चर्चेत आलेले युवा वक्ते विवेकानंद पाटील आणि शेतकरी नेते रविराज साबळे पाटील यांचाही समावेश आहे.
बीड जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कारखानदारांकडून योग्य दर मिळावा, तसेच दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी, या मागण्यांसाठी पाडळशिंगी टोलनाका येथे सलग दोन दिवस आंदोलन करण्यात आले. शुक्रवारी झालेल्या आंदोलनात शेतकऱ्यांनी सुमारे एक तास महामार्ग रोखला होता. त्यानंतर शनिवारी झालेल्या आंदोलनात विवेकानंद पाटील आणि शेतकरी नेते रविराज साबळे पाटील सहभागी झाले होते. यावेळी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थिती लावत आपल्या मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेतली.आंदोलकांनी टोलनाक्यावरच धुळे-सोलापूर महामार्गावर ठिय्या दिल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. सुमारे दोन तास वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने महामार्गावर दोन्ही बाजूंनी जवळपास दहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. या वाहतूक कोंडीचा फटका सामान्य प्रवाशांसह वाहनधारकांना बसला. दरम्यान, पोलिस आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक चकमकही झाली. आयजी वीरेंद्र मिश्र यांनाही या वाहतूक कोंडीचा फटका बसल्याची माहिती आहे.
दरम्यान, आंदोलनासाठी पूर्वपरवानगी न घेणे, जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे आणि चिथावणीखोर भाषणे केल्याचा आरोप पोलिसांकडून करण्यात आला आहे. गेवराई पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार विशाल कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून विवेकानंद पाटील, रविराज साबळे पाटील यांच्यासह चेतन बहिर, अमोल मुंजाळ, संतोष उखाडे, आर्यन जाधव, विजय काळे आदींसह एकूण २५० जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत

