विजय निकम नंदुरबार… ### रसगुल्ल्याच्या नादात बोक्याचे दात पडले; वृंदावन नगरातील नागरिकांची उडाली झोप!

दरोडेखोरांच्या भीतीने अख्खी कॉलनी जागी; पोलिसांनाही पाचारण, अखेर ‘डबाधारी’ चोराचा पर्दाफाश होताच पिकला एकच हशा!

दिवाळीचा फराळ संपला, मात्र त्यातील एका रिकाम्या रसगुल्ल्याच्या डब्याने शहादा शहरातील वृंदावन नगरातील नागरिकांची चांगलीच झोप उडवली. पहाटेच्या सुमारास घरांचे दरवाजे जोरजोरात वाजू लागल्याने परिसरात दरोडेखोर शिरल्याची अफवा पसरली. शिक्षकासह अख्खी कॉलनी जागी झाली. पोलिसांनाही फोन करून बोलावण्यात आले. मात्र, तासाभराच्या शोधमोहिमेनंतर ज्याला दरोडेखोर समजले जात होते, तो चक्क डोक्यात रसगुल्ल्याचा रिकामा टिनचा डबा अडकलेला बोका असल्याचे समोर आले आणि भीतीचे रूपांतर एकच हशात झाले.

शुक्रवारी पहाटे तीन ते साडेतीनच्या सुमारास वृंदावन नगरातील एका घराचा दरवाजा कोणीतरी जोरजोरात ठोठावत असल्याचा आवाज आला. गाढ झोपेत असलेल्या कुटुंबीयांना जाग आली. दरोडेखोर आल्याच्या संशयाने घरातील आणि बाहेरील दिवे लावण्यात आले. आरडाओरडा सुरू होताच शेजारीही घराबाहेर आले. दरम्यान, परिसरातील इतर घरांचे दरवाजेही धडाधड वाजू लागल्याने सशस्त्र चोरट्यांची टोळीच आल्याचा संशय नागरिकांना आला. एका शिक्षकाने तातडीने शहादा पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

मात्र, या संपूर्ण गोंधळामागचे कारण अगदी वेगळेच होते. दिवाळीनिमित्त आणलेल्या मिठाईतील ‘भिकाजी रसगुल्ल्या’चा डबा रिकामा झाल्यानंतर तो घराबाहेर ठेवण्यात आला होता. पहाटेच्या सुमारास खाण्याच्या शोधात फिरणाऱ्या एका बोक्याला या डब्यात काहीतरी गोड शिल्लक असल्याचा मोह झाला. त्याने डब्यात तोंड घातले; मात्र त्याचे तोंड डब्यात घट्ट अडकले.

डोक्यावर डबा अडकल्याने बोक्याला काहीच दिसेनासे झाले. सुटका करण्याच्या प्रयत्नात तो सैरावैरा धावत घरांच्या दरवाजांना धडकू लागला. त्याच्या या धडपडीमुळे घरातील नागरिकांना मात्र चोरटे दरवाजे तोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा भास झाला. एका घरापासून दुसऱ्या घरापर्यंत धडका देत फिरणाऱ्या बोक्यामुळे परिसरात चोरट्यांची टोळी आल्याची भीती निर्माण झाली.

अखेर परिसरातील एका पतसंस्थेच्या सुरक्षा रक्षकाच्या नजरेस डोक्यात डबा अडकलेला बोका पडला. त्याने नागरिकांना आवाज देत हा प्रकार लक्षात आणून दिला. त्यानंतर सर्व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. डब्यात अडकलेल्या बोक्याची अवस्था पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

दरम्यान, डबा अडकल्याने बोक्याला श्वास घेण्यास त्रास होऊन तो बेशुद्ध पडला होता. नागरिकांनी तातडीने डबा कापून त्याची सुटका केली. काही वेळाने बोका शुद्धीवर आला आणि गुरगुरत जवळच्या भिंतीवर जाऊन बसला. जमलेल्या नागरिकांकडे तो आश्चर्याने पाहत होता.

या धडपडीत बोक्याच्या तोंडातील काही दातही तुटून डब्यात पडल्याचे समोर आले. एका रिकाम्या रसगुल्ल्याच्या डब्याने अख्ख्या कॉलनीला रात्रभर जागे ठेवले, पोलिसांनाही सतर्क केले आणि शेवटी नागरिकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवले. दीड तास चाललेल्या या अनोख्या थराराची सकाळ होताच संपूर्ण वृंदावन नगरात रंगतदार चर्चा सुरू झाली.

दरोडेखोरांच्या भीतीने जागी झालेली कॉलनी अखेर एका उपाशी बोक्याच्या ‘रसगुल्ला मोहिमे’ची साक्षीदार ठरली. मात्र, या सगळ्या गोंधळानंतर रिकामा रसगुल्ल्याचा डबा नेमका कोणाच्या घरचा, याची चर्चा दिवसभर रंगत राहिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *