पैठण अविनाश गर्डे
पैठण शहरालगत पाटेगाव शिवारातील गोदावरी नदीच्या तीरावर ११ कोटी रुपये खर्च करून नियोजित भव्य श्री खाटूश्याम मंदिर उभारले जाणार आहे. या मंदिराचे भूमिपूजन कार्तिकी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर खासदार संदीपान भुमरे आणि आमदार विलास भुमरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
हरी कृपा सेवा समितीच्या वतीने या मंदिराची उभारणी केली जाणार असून नाथ वंशज हभप योगीराज महाराज गोसावी यांच्या हस्ते कुदळ मारून भूमिपूजन सोहळा पार पडला.
या मंदिराच्या आवारात भक्तनिवास, ध्यान मंदिर, सभागृह, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह आणि वृद्धाश्रम उभारले जाणार आहे.
संतांची पावन भूमी असलेल्या पैठण नगरीत श्रद्धा, भक्ती आणि सेवाभावाचा नवा अध्याय सुरू होणार आहे. श्री हरिकृपा सेवा समितीच्या वतीने पैठण-शेवगाव रोडवरील गोदाकाठच्या पाटेगाव पुलाजवळ भव्य श्री खाटूश्याम मंदिर उभारण्याचा संकल्प करण्यात आला असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष सतीश उदावंत यांनी यावेळी दिली. या मंदिरासह विविध सेवाभावी प्रकल्पांसाठी सुमारे ११ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, पुढील दोन वर्षांत संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याचा समितीचा मानस असल्याचे उदावंत यांनी सांगितले.
श्री हरिकृपा सेवा समितीने धार्मिक कार्यासोबतच अन्नदान आणि सामाजिक सेवेच्या माध्यमातून पैठणमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या समितीने धार्मिक आणि सामाजिक सेवेचा विस्तार करण्याच्या उद्देशाने श्री खाटूश्याम मंदिर उभारणीचा संकल्प हाती घेतला आहे.
हा प्रकल्प केवळ मंदिर उभारणीपुरता मर्यादित नसून भक्ती, आध्यात्मिक चिंतन, शैक्षणिक सुविधा आणि सामाजिक सेवेचे केंद्र म्हणून ओळखले जाणार असल्याचे खासदार संदीपान भुमरे यांनी यावेळी स्पष्ट केले. या मंदिर उभारणीसाठी समितीला सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आमदार विलास भुमरे यांनी सांगितले.
यावेळी नगराध्यक्ष भूषण कावसनकर, उपनगराध्यक्ष तुषार पाटील, हभप योगीराज गोसावी, राजेंद्र वाघमोडे, हभप शिवाजी महाराज, माजी नगराध्यक्ष सुरज लोळगे, चेअरमन किशोर चौहान, पंचायत समिती सभापती विनोद बोंबले, नितीन तांबे, मनोज पेरे, जितू परदेशी, सुनील शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.
